|| सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ||
सत्संग हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. मुळात आपलं धर्म सुद्धा संवादाचा आहे. सत्संग म्हणजे गुरु सेवाच होय. हे व्रत आहे आणि गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ही श्रद्धा कृती दिसली पाहिजे आपल्या श्रद्धेचा एक भाग म्हणून आपण सत्संगास हजर राहावे. सर्व भक्तांनी एकत्र यावे, विचार विनिमय करावा.
सत्संगाची बैठक ही अध्यात्माची बैठक असून या अध्यात्म बैठकीला आपले गुरु प्रत्यक्ष हजर आहेत, असा विशिष्ट भाव तुम्हा लोकांच्या मनामध्ये असण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच आम्ही हा सत्संग साजरा करतो; असे तुमचे मूळ विचार असायला पाहिजेत. सत्संगातर्फे कार्यक्रम घेणे, सत्संगाची बैठक घेणे हा महत्त्वाचा भाग नसून 'गुरुवाक्य मज कामधेनू, मनी नाही अनुमानु, सेवावृद्धी पावविनार आपणू श्री नृसिंह सरस्वती'. मला गुरु वाक्य प्रमाण असून तेच मज कामधेनू आहे आणि तीच माझी जीवनाची पूर्तता आहे अशी दृढ श्रद्धा तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. सत्संगाच्या बैठकीला ईश्वराचे अधिष्ठान असल्यामुळे दर सत्संगामध्ये आनंद निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सत्संग मनावर चांगला परिणाम करील व आपल्या मनावर एक प्रकारचे चांगले संस्कार होतील आणि आपला ओढा परमार्थाकडे लागेल.
सत्संगाची सुरुवात गुरु ध्यानाने करावी. त्याचबरोबर आपली जी प्रधान देवता श्री दत्तात्रेय यांचेही स्मरण करावे. मागील सत्संगाच्या बैठकीत ठरवल्याप्रमाणे योजना आखरी असल्यास ती पूर्ण झाली किंवा नाही ते पाहावे, त्यानंतर पुढील महिन्यात काय करायचे ते ठरवावे. नंतर उपस्थितांपैकी कोणालाही सुविचार मांडण्यास सांगावे यामुळे भक्तांमध्ये सभाधीटपणा येण्यास मदत होते. हे सर्व झाल्यावर ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणावे. आरती आणि प्रार्थना म्हणून समाप्ती करावी. सत्संग जरी महिन्यातून एकदाच होत असला तरी त्याचे अनुसंधान मात्र भक्तांनी सतत ठेवावे.
एक कायम लक्षात ठेवावे की सत्संग मंडळे कार्य करीत नसून करता व करविता निराळाच असतो. करता व करविता नेहमीच अव्यक्तच असतो पण कार्य मात्र व्यक्त असते. सत्संगातून तुम्हाला कार्य करण्याची स्फूर्ती, मानसिक उत्साह आणि आनंद मिळाला पाहिजे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।